कुंभमेळा प्रतीकात्मक रूपात साजरा करावा : पंतप्रधान मोदी

कुंभमेळा प्रतीकात्मक रूपात साजरा करावा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, अनेक राज्यांत कठोर निर्बंध करण्यात येत आहेत. तरी मात्र, काही ठिकाणी याचा विसर पडल्याचे दिसून येते, मग त्यात बंगाल मधील प्रचार रॅली असो की हरिद्वार येथील कुंभमेळा. दरम्यान, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा, असे आवाहन संतमंडळींना केले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून, या कुंभमेळ्यात झालेल्या लाखो भाविकांच्या गर्दीमुळे हजारो जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. अनेक साधु-संतांसह भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठे विधान केले असून, त्यांनी सांगितले, मी संतमंडळींना आवाहन केले आहे की, आता कुंभमेळ्यातील दोन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक रूपातच साजरा करावा. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला बळ मिळेल.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाबाबत प्रतिक्रिया देताना महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांनी सांगितले की, माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. स्वत:च्या आणि इतरांच्या जीविताचे रक्षण करणे हे महापुण्याचे काम आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन धर्मपरायण जनतेने नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळ्याची समाप्ती 27 एप्रिल रोजी होणार आहे. वाढत्या कोरोनामुळे कुंभमेळा वेळेआधीच समाप्त केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कुंभमेळा वेळेपूर्वीच संपवण्याची कुठलीही योजना नसल्याचे उत्तराखंड सरकारने स्पष्ट केल्याने आता कुंभमेळा नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आयोजित होईल हे स्पष्ट झाले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub