स्थलांतरित पक्ष्यांनी प्रदूषणामुळे फिरवली मुंबईकडे पाठ!

स्थलांतरित पक्ष्यांनी प्रदूषणामुळे फिरवली मुंबईकडे पाठ!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुंबईत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले प्रकल्प, निर्माणधिन इमारती, वाढते प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नागरीकरणामुळे पाणथळ जागा बुजवल्याने त्याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली आहे.

कडाक्याच्या थंडीपासून जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून भारतात दाखल होतात. येथे दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम सहा महिने असतो. भारतात स्थलांतरित होणाऱ्या सुमारे 230 तर महाराष्ट्रात 60च्या आसपास प्रजाती आहेत. जेथे जास्त पाणी तेथे अन्नाची उपलब्धता जास्त असते, अशाठिकाणी पक्षी स्थलांतर करतात. मात्र, गेल्या 30 वर्षांत मुंबईत असलेले 42 टक्के जंगल नष्ट झाले असून, त्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली असून, नवी मुंबई, ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

मुंबईतील तलाव, नद्या, पाणथळ जागा प्रदूषित झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांना अन्न मिळत नाही. मुंबईत आता केवळ 13 टक्के हिरवळ असून, गेल्या 40 वर्षांत मुंबईतील हिरवळ सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाली आहे. मुंबईतील एकूण 88 प्रभागांपैकी 68 प्रभागांतील हिरवळ गेल्या 20 वर्षांत कमी झाली आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या अधिवासालगत मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचे काम सुरू झाले असून, मानवी हस्तक्षेपही वाढला आहे. याचा फटका पक्ष्यांना बसत आहे. त्यामुळे बहुतांश स्थलांतरित पक्षी आता मुंबईऐवजी ठाणे व नवी मुंबई परिसरात मोठ्या संख्येने आढळत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub