केरळनंतर आता मान्सूनचे महाराष्ट्रातही आगमन!

केरळनंतर आता मान्सूनचे महाराष्ट्रातही आगमन!

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून हंगामात सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, अपेक्षेपेक्षा चार दिवस उशीराने केरळमध्ये मान्सुनचे आगमन झाले असून, पुढील एक-दोन दिवस केरळमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, केरळमध्ये चार दिवस उशीराने आमगन करणारा मान्सून महाराष्ट्रात मात्र दोन दिवस आधीच दाखल झाल्याची माहिती भारतीय हवमान विभागने दिली आहे. रत्नागिरीच्या हर्णे येथे मान्सून दाखल झाला आहे. येथून पुढे राज्यात मान्सूनचा प्रवास सुरु होणार आहे.

पुढील काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून व्यापून टाकणार आहे. राज्यातील हवामानाची परिस्थिती मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून, हर्णेपर्यंत पोहचलेला मान्सून नंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भागात पोहचून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. दरम्यान, तीन तारखेला लक्षद्वीप दक्षिण केरळ आणि दक्षिण तमिळनाडूत सक्रीय झालेला मान्सून शुक्रवारी संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू व्यापून पुढे कर्नाटकच्या संपूर्ण किनारपट्टीसह निम्म्या कर्नाटकात आणि रायलसीमाच्या काही भागात दाखल झाला आहे.

मान्सून शुक्रवारी कर्नाटक किनारपट्टीवर कारवारपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर गोव्यासह कर्नाटकचा उर्वरित अंतर्गत भाग व्यापून आंध्रप्रदेश, तेलंगण आणि दक्षिण कोकणासह महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील काही जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान, जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub