परभणी विभागाच्या चार आगारामधील बहुतांश बसेस आल्या मोडकळीस!

परभणी विभागाच्या चार आगारामधील बहुतांश बसेस आल्या मोडकळीस!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या 4 आगारामध्ये 266 बसेस आहेत. यातील बहुतांश बसेस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास पूर्ण करावा लागतो. विशेष म्हणजे या चार आगारातील बसच्या दुरुस्तीसाठी वर्षाला तब्बल 6 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो.

राज्यात मागील वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग कमी-अधिक होत आहे त्यामुळे वारंवार लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात येत असल्यामुळे परभणी विभागाच्या चारही आगारातील बसेस एका जागेवरच आहेत. त्यामुळे बसच्या नादुरुस्तीमध्ये आणखीनच भर पडली आहे. काही बसेसच्या काचा निखळल्या असून काही बसेसच्या शीट फाटल्या आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या एसटी महामंडळ प्रशासनाला बस सुरू करण्यापूर्वी बसेसची दुरुस्ती करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे यावर्षी बसेसच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जिल्ह्यामध्ये कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून वारंवार संचारबंदी, लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार बंद ठेवावी लागते. विशेष म्हणजे वर्षभरातून केवळ अडीच महिन्यात बस रस्त्यावरून धावली आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाला या वर्षभरात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून काही बसेस एका जागेवरच उभे आहेत. त्यामुळे या बसेस सुरू करण्यासाठी खर्च वाढणार आहे. परिणामी वर्षाकाठी साडेसहा कोटी रुपयांचा खर्च बस दुरुस्तीसाठी होण्याची शक्यता आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub