कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : आ.डॉ. राहुल पाटील

कोरोना रुग्णांबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही : आ.डॉ. राहुल पाटील

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, प्रशासनाकडून योग्य ते सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, परभणी शहरात आणि जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटर्समधे स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, ऑक्सिजन पुरवठा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणीच्या प्रमाणात पुरवठा आदी बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दि. 10 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आ.डॉ. राहुल पाटील यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीतील परिस्थितीचा आढावा घेतला. परभणी शहरातील सरकारी आणि खाजगी कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सोईंबाबत जाणून घेतले. रेमीडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व त्याची चढ्या भावात होणारी विक्री, उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा, भोजन व्यवस्था, याबाबतीत यापुढे कुठलाही हलगर्जीपणा  खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही  त्यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दररोज संपर्कात असून, या बाबतचे अपडेट दररोज मुख्यमंत्र्यांना देत असल्याचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. कल्याण कदम, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीचे संचालक अरुण पाटील, अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub