कोरोनानंतर आता ‘चापरे’ ची दहशत

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये उद्रेक झाल्यानंतर कोरोनाचे विषाणू जगभरात पोहोचले. त्यामुळे अनेक देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. असे असले तरी मात्र कोरोनाव्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारताकडून जे प्रयत्न केले जात आहेत, त्याचे कौतुक जागतिक स्तरावरही केले जात आहे. दरम्यान, एकीकडे जग कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे मानवाकडून मानवाला संसर्ग होणारा आणखीन एक चापरे नावाचा विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला आहे.
जगात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला 17 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पुर्ण झाला आहे. मात्र आजही जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. एकीकडे जग कोरोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे मानवाकडून मानवाला संसर्ग होणारा आणखीन एक विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला असून, अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्था असणाऱ्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही हा विषाणू सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या विषाणुमूळे ताप येतो आणि हा ताप थेट मेंदूवर परिणाम करतो. या विषाणूमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका असतो.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बोलिव्हियामध्ये सापडलेल्या या विषाणूचे नाव चापरे विषाणू असे आहे. सर्वात आधी हा विषाणू 2004 साली बोलिव्हियामध्ये चापरे भागात आढळून आला होता. सीडीसीमधील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ असणाऱ्या कॅटलिन कोसाबूम यांनी दिलेल्या माहितीनुसार चापरेचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर व्रण उठणे, डोळे चुरचुरणे अशी लक्षणे दिसून येतात. या विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणतेही ठोस उपचार सापडलेले नसून कोरोनाप्रमाणेच जमेल त्या पद्धतीने रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करणे हाच सध्या एकमेव मार्ग उपलब्ध आहेत.
दरम्यान, 2019 साली या विषाणूचा संसर्ग तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना झाले आणि त्यानंतर या तिघांपैकी दोघांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याचेही सीडीसीने सांगितले आहे. दरम्यान, 2019 मध्ये चापरे विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होत असल्याचे पहिल्यांदा दिसून आले. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येणाऱ्यांना याची लागण होण्याची शक्यात अधिक असते. आता मात्र याची भीती अधिक वाढली असून, अशाप्रकारे चापरेचा संसर्ग वाढत जाऊन त्याने साथीचे रुप धारण केल्यास आरोग्य व्यवस्था कोलमडून पडतील अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Click here to join the WhatsApp group.