मराठवाड्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या

मराठवाड्यासाठी केवळ चारच रेल्वे गाड्या

परभणी (प्रतिनिधी) : कोरोना वायरसने संपूर्ण राज्याला जनु विळखाच घातला आहे. जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून सुट दिली जात असून, भारतीय रेल्वेने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे सुरु केली होती. मात्र दक्षिण मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष रेल्वे गाड्यांना आता बंद केली जात असून, मराठवाड्यासाठी फक्त चारच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत.

राज्यात अनलॉकच्या प्रक्रियेनंतर दिवाळी सणासाठी सुरू केलेली नांदेड-पनवेल ही विशेष रेल्वेगाडीही बंद केली जाणार असून, केवळ तीन ते चार रेल्वे गाड्याच मराठवाड्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा आरक्षण मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाने राज्यात रेल्वे वाहतूक सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी आशा होती. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नांदेड-पनवेल ही रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दिवस मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वेसेवाही चालविण्यात आली.

दरम्यान, मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद करण्यात आली असून, पनवेल एक्स्प्रेस देखील 29 नोव्हेंबर पर्यंतच धावणार आहे.  त्यानंतर मात्र दिल्लीसाठी सचखंड एक्स्प्रेस, मुंबईसाठी नंदीग्राम एक्स्प्रेस आणि हैदराबादसाठी परभणी-हैदराबाद व औरंगाबाद-हैदराबाद या चारच रेल्वे गाड्या धावत आहेत. या चारही गाड्यांना बहुतांश वेळा आरक्षण फुल्ल झालेले असते. त्यामुळे नांदेड, परभणी या स्थानकावरुन औरंगाबाद येथे जाणाऱ्या प्रवाशांना आरक्षण मिळत नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद, मनमाडपर्यंतच मराठवाड्यातून सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub