परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार!

परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यासहीत जिल्ह्यात देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती आ.डॉ. राहुल पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनची कमतरता तसेच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्ह्यासाठी लागणार ऑक्सिजनसाठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमिवर, परभणी तालुक्याचे आ.डॉ. राहुल पाटील यांनी येत्या दोन दिवसात ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली असून, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मा. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मागणीला मंजुरी दिली; येत्या दोन दिवसात परभणी येथे ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

आ. पाटील यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले की, परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या अनुषंगाने मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे परभणी येथे ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी परळी थर्मल येथील ऑक्सीजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले. आता परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत येत्या दोन दिवसात ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

सध्या परभणी एमआयडीसी परिसरात खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प अस्तित्वात असून, त्याद्वारे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोवीड सेंटर्सना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यात येत आहेत. जिल्ह्याला दररोज 25 KL क्षमतेच्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. दरम्यान, नव्याने कार्यान्वित होणाऱ्या ऑक्सिजन प्रकल्पातून 80,000 लिटर प्रतितास एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन साठ्याची कमतरता भासणार नाही व रुग्णांना तातडीने सुविधा उपलब्ध होईल. असे आ.डॉ. राहुल पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub