राज्यात मोठ्या संख्येने नोकरभरतीला सुरुवात!

राज्यात मोठ्या संख्येने नोकरभरतीला सुरुवात!

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाव्हायरविरुद्धची सर्वात मोठी मोहीम 16 जानेवारीपासून सुरु झाली आहे. देशात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात असून, दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. दरम्यान, मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या आणि अनेक नेतेमंडळींकडून अधोरेखित केल्या गेलेल्या राज्यातील नोकरभरतीला अखेर राज्यात सुरुवात झाली असून, शनिवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकरभरती प्रक्रियेस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आता अखेर ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात 5 हजार 297 पदांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 231 पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल 13 हजार 800 पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे. राज्यात 28 फेब्रुवारीला आरोग्य विभागाची भरती एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी यावेळी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रवर्गातून अर्ज केलेल्या अर्जदारांना आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नव्याने प्रमाणपत्र घेऊन पुन्हा ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एकिकडे भरतीसाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरीही मराठा नेते मात्र तूर्तास नोकरभरती होऊ नये यासाठी आग्रही आहेत. मात्र, नोकरभरतीचा हा प्रश्न प्रतिक्षेत ठेवत मराठा समाज आणि इतर समाजातील पात्र उमेदवारांवर किती अन्याय करायचा याबाबत मंत्रीमंडळात चर्चा झाली आणि अखेर राज्यातील लाखो बेरोजगारांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub