राज्यात मॉन्सून दाखल झाला तरी तुलनेने पाऊस कमीच!

राज्यात मॉन्सून दाखल झाला तरी तुलनेने पाऊस कमीच!

पुणे (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून हंगामात सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, अपेक्षेपेक्षा चार दिवस उशीराने केरळमध्ये आमगन करणारा मान्सून महाराष्ट्रात दोन दिवस आधीच दाखल झाला. त्यानंतर मात्र, त्याची प्रगती काहीशी थंडावल्याचे दिसत आहे. शनिवार दि. 5 जून रोजी दक्षिण कोकण, सोलापूरपर्यंत मजल मारणारा मॉन्सून रविवार दि. 6 जून पर्यंत फक्त अलिबाग, पुणे आणि करमाळ्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकला. गंमत म्हणजे मॉन्सूनचे वारे दाखल झाले मात्र पाऊस पडत नसल्याचे चित्रही दिसत आहे.

उत्तर महाराष्ट्र ते केरळ किणारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाची पट्टा तयार झाला आहे. तसेच, कोकण गोव्यावर चक्रीय चक्रवात तयार झाल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. मॉन्सून जरी दाखल झाला, तरी पुढील तीन चार दिवस त्या क्षेत्रात तुलनेने कमी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवार दि. 6 जून रोजी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मॉन्सूनपूर्वच पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा,कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि दक्षिण रायगड जिल्ह्यांत मॉन्सून दाखल झाला आहे.

दरम्यान, रविवार दि. 6 जून पर्यंत राज्यातील 30 टक्के भाग मान्सूनने व्यापला असून, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मॉन्सूनपूर्व पाऊस पडला आहे. तर पुढील काही दिवस मॉन्सूनची प्रगती रोडावण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. राज्यात मॉन्सून दाखल झाला तरी तुलनेने पाऊस कमी दिसत आहे. दरम्यान, जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकेच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल, अशी माहिती हवामान खात्याने यापूर्वीच दिली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub