जिल्ह्यात रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा येणार!

जिल्ह्यात रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा येणार!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यासहीत जिल्ह्यात देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. दरम्यान, जिल्ह्यात रेमडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु झाला असून, राज्यातील चार प्रमुख कंपन्याकडून हे इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने जिल्ह्यासाठी पुरवठा होत असलेले रेमडिसिव्हिर इंजेक्शन कमी पडत आहेत. या इंजेक्शनचा योग्य पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. रुग्णालय निहाय रुग्णांची संख्या आणि आवश्यक असणारे इंजेक्शन याची मागणी दररोज नोंदविली जात आहे. प्राप्त झालेल्या साठ्याचा त्याच रुग्णालयांना डॉक्टरामार्फत पुरवठा केला जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णापर्यंत इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

परभणी जिल्ह्यासाठी नागपूर येथील केंद्रातून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा केला जात असून, आतापर्यंत ठराविक एकाच कंपनीकडून हे इंजेक्शन उपलब्ध होत होते. मात्र येथून पुढे हेट्रो लिमिटेड, मायलॉन लिमिटेड, पडीला फार्मा आणि सिप्ला या कंपन्याचे इंजेक्शन जिल्ह्याला प्राप्त होणार आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बळीराम मारेवाड यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्ण व त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ पाहता, खबरदारीची उपाययोजना म्हणून कोविड रूग्णालय, अलगीकरण, विलगीकरण कक्ष स्थापन करून बाधित रूग्णांची काळजी व उपचार करण्याच्या दृष्टीने शासकीय इमारत अधिग्रहीत करणे आवश्यक झाल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिषीर व सह्याद्री ही दोन वसतिगृहे अधिग्रहीत करण्याचे आदेश दिले आहेत. सदर इमारती महानगरपालिकेचे आयुक्त यांनी ताब्यात घेवून त्या ठिकाणी निर्देशीत केल्याप्रमाणे कोविड केअर सेंटर, अलगीकरण, विलगीकरण कक्षाची उभारणी करण्याची कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub