राज्यातील निर्बंध शिथिल की अधिक कडक होणार?

राज्यातील निर्बंध शिथिल की अधिक कडक होणार?

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमिवर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि. 10 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दहावी आणि बारावीची परीक्षा तसेच निर्बंध शिथिल करायचे की अधिक कठोर करायचे यावर विचारविनिमय केला जाणार आहे. मात्र, रुग्णसंख्या कमी होत नसल्याने निर्बंघ अधिक कडक करण्याचा सल्ला कृती दल व अन्य तज्ज्ञांनी सरकारला दिला आहे.

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने 30 तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रि या उमटली. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. तर सोमवार दि. 12 एप्रिल पासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला असून, भाजपने व्यापारी वर्गाला पाठबळ देत त्यांच्या भूमिके चे समर्थन केले आहे. दुसरीकडे राज्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे वारंवार कान टोचण्यात येत आहेत. तसेच सरकारच्या भूमिके बद्दल टीका देखील होत आहे.

या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवार दि. 10 एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. यात करोनाची सद्यस्थिती, लसींचा साठा, निर्बंध शिथिल करणे, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे काय करायचे यावर विचारविनिमय केला जाणार आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊनची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे, तर सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकाने उघडणारच, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला असून, व्यापाऱ्यांना भाजप व अन्य काही पक्षांकडून पाठिंबा दिला जात आहे.

रुग्णसंख्या कमी होत नसल्याने लॉकडाऊन अधिक कडक करावी, असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या साऱ्यांवर आज खल होईल. त्यानंतरच मुख्यमंत्री निर्बंध अधिक कठोर करायचे की शिथिल करायचे याचा निर्णय घेतील. त्यातच मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. परीक्षा सध्या पुढे ढकलाव्यात आणि परिस्थिती आटोक्यात आल्यावर त्या घेण्यात याव्यात, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही सरकारला विद्यार्थ्यांची चिंता असल्याचे म्हटले आहे. या सर्व समस्यांतून मार्ग काढण्यासाठीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub