उपविभागीय अधिकारीच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला!

उपविभागीय अधिकारीच्या गाडीवर रेती माफियांचा हल्ला!

सोनपेठ (परभणी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, कोरोना लसींचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशातच मात्र, सोनपेठ तालुक्यात वाढत्या रेती चोरीच्या विरुद्ध उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी कारवाई करण्यासाठी मोहीम राबवल्यामुळे रेती माफियांनी त्यांच्या गाडीवरच दगडफेक करुन हल्ला केल्याची घटना मंगळवार दि. 11 मे रोजी घडली.

सोनपेठ तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून अवैध रेती उपसा जोरात चालू असून, चोरलेली रेती परजिल्ह्यात पळवली जात आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्यावरून पाथरी येथील उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी अवैध रेती माफियांविरुद्ध एक मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र मंगळवार दि. 11 मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी निकाळजे हे आपल्या वाहनातून नरवाडी परिसरातून जात असतांना अचानक त्यांच्या गाडीवर अज्ञात रेती माफियांनी हल्ला केला.

उपविभागीय अधिकारी निकाळजे यांच्या वाहनावर दगडफेक करून अज्ञात रेती माफियांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यामध्ये उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे व त्यांचे चालक एकनाथ गायकवाड मात्र बालंबाल बचावले. दरम्यान, रेती माफियांनी याआधी देखील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करून जखमी केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यातील लासीना, कान्हेगाव, खडका, मोहळा तसेच इतर ठिकाणाहून अवैध रेती उपसा केला जातो तसेच तालुक्या शेजारी असणाऱ्या पाथरी तालुक्यातील मुद्गल, मानवत तालुक्यातील वांगी या ठिकाणाहून देखील रेती उपसा हा रात्रंदिवस चालू असून त्याची संपुर्ण अवजड वाहतूक ही सोनपेठ तालुक्यातून सर्रास केली जाते.

अवैध व अवजड रेती वाहतुकीमुळे तालुक्यातील मुख्य रस्ते खराब झाले असून, या रेती व्यवसायातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडवला जातो. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हे रेती माफिया अवैध रेती उपसा करत असून, अधिकाऱ्यांच्या गाड्यावर हल्ले करणे तसेच पकडलेली वाहने पळवून नेण्याचे प्रकार देखील अनेकदा घडलेले आहेत. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी संबंधित प्रकार घडल्यानंतर सोनपेठ पोलिस ठाण्यात येऊन अज्ञात रेती माफियांच्या विरुद्ध तक्रार दिली असून सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub