सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी दहावीच्या परीक्षा होणार : वर्षा गायकवाड

सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी दहावीच्या परीक्षा होणार : वर्षा गायकवाड

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावी अणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून, आता दहावीची परीक्षा ही जूनमध्ये तर बारावीच्या परीक्षा ह्या मे महिन्याच्या अखेरीस होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने बुधवार दि. 14 एप्रिल रोजी सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला असून, बारावीच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करणार नाही. राज्यातील दहावीच्या परीक्षा होणार असून, राज्य सरकार सध्या तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई परीक्षांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांनंतर त्यांच्या गुणपत्रिकांसाठी सीबीएसई बोर्डाकडून विशिष्ट प्रणाली तयार केली जाणार आहे. मात्र, यामध्ये नेमक्या कोणत्या बाबींचा समावेश असेल? वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आधारभूत मानले जाणार आहेत का? याविषयी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून आता या परिक्षांबाबत 1 जून रोजी सीबीएसईकडून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub