जिल्ह्यातील बेकार झालेले हात पुन्हा कामावर

जिल्ह्यातील बेकार झालेले हात पुन्हा कामावर

परभणी (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण जिल्हा हतबल झाला असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट देण्यात आली असून, नोव्हेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होण्याची शक्यता आहे. कोरोना आणि लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील उद्योग हळूहळू रुळावर येत असून, बेरोजगार झालेल्या कामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे.

राज्यात आता लॉकडाउनचा विषय राहिला नसून येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्र पूर्ण अनलॉक होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच उद्योग हळूहळू रुळावर येत आहेत. बेरोजगार झालेल्या कामगारांच्या हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे. जिल्ह्यात आधीच मोठ्या उद्योगांचा वाणवा असून, जे उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोनाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सहा महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात कृषी क्षेत्रावर आधारित सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील, कृषी अभियांत्रिकी हे उद्योग सुरू झाले आहेत.

जिल्ह्यात सिमेंट पाईप, पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले असून, परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार आता परतू लागले आहेत. एकंदर आढावा घेतला असता, 40 टक्के कामगार परतले आहेत. स्थानिक कामगारांपैकीही 70 टक्के कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. जिल्ह्यात कृषीवर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. काही प्रमाणात इतर उद्योग चालविले जातात. त्यापैकीही अनेक उद्योजकांनी पुन्हा कंपन्या सुरू केल्या आहेत. ही प्रक्रिया संथगतीने असली तरी सकारात्मकतेकडे नेणारी आहे.

परभणी जिल्ह्यात कृषी व्यवसायावर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यात सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील आणि औजारे बनविणारे उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. याशिवाय टायर रिमोल्डींग आणि पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील औद्यागिक वसाहतींमधील उद्योग जवळपास ठप्प होते. या काळात साधारणत: 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या शिवाय आंतर जिल्हा आणि आंतर राज्य वाहतूक बंद असल्याने साधारणत: दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसला.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *