आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री ठाकरे

आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वच देशातील वैज्ञानिक लस तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असून, कोरोनाव्हायरविरुद्धची जगातील सर्वात मोठी मोहीम भारतीय भूमीवर शनिवार दि. 16 जानेवारीपासून सुरु झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील एक वर्षापासून राज्यातील जनता धास्तावलेली होती. कोरोनाच्या संसर्गावर कोणतीही लस नसल्याने केवळ प्रतिबंधात्मक उपाय करणे एवढेच नागरिकांच्या हाती होते. त्यातच तीन-चार महिन्यांपासून कोरोनाची लस येणार, या बातम्या नागरिकांना दिलासा देत असल्या तरी प्रत्यक्षात लस कधी येणार, याची खरी प्रतीक्षा होती. ती आता संपली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असे म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेने जनतेला संबोधित केले.

कोरोना काळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये या संसर्गाने ज्या प्रकारे थैमान घातले होते, ते दिवस आठवताना या दिवसांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्ध्याला मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला. कोरोना काळात मोलाचे सहकार्य देणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार, म्हणून केला. दरम्यान, कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिस्थिती किती बिकट होती, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी लसीचा शुभारंभ झाल्याचा आनंद वयक्त केला. यावेळी संकट अजूनही टळलेले नाही, असे म्हणत त्यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा देखील दिला आहे.

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचे महत्त्व पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणे योग्य नसल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, सध्या आपल्या हाताशी लस आली असली तरीही ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्याचा प्रभावही किती दिवसांसाठी राहणार हेसुद्धा येत्या दिवसांतच स्पष्ट होईल. कोरोना सेंटरमध्ये सध्या जाणाऱ्यां रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे चित्र असेच राहो अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवाय कोरोनाचा नायनाट होईपर्यंत शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करण्यात यावे, आवाहन त्यांनी जनतेला केले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub