बाबरी मशीद प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

अयोध्या : कोरोनामुळे देशातील परिस्थिती खुप गंभीर झाली आहे. यातच अयोध्येतील राम जन्मभूमीचा खटला निकाली निघाला. राम लल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन देखील झाले आहे. मात्र, 1992 साली बाबरी मशिद घटने प्रकारणातील मुख्य आरोपींवर अंतिम निकाल आज दि. 30 सप्टेंबर रोजी देण्यात आला. दरम्यान, 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने केली आहे.
बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले होते. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असे निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवले. सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितले की, विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही. अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचे निदर्शनात आले, असे न्यायालयाने यावेळी सांगत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
बाबरी मशीद प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी 16 जण खटला सुरु असताना मरण पावले. 16व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते.
न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण 26 आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.
जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.