आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल!

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल!

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात भारतीय संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताने एकदिवसीय मालिका गमावल्या नंतर तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने जिंकली, तसेच 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या विजयासह टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. यानंतर आता भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याची शक्यता देखील वाढली आहे.

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाले. ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, एडलेडमध्ये खेळलेली पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने मेलबर्नमधील कसोटी सामना जिंकला तर सिडनीमध्ये सामना अनिर्णित राखला. यानंतर, मंगळवारी ब्रिस्बेनमधील निर्णायक कसोटी सामना तीन विकेट्सने जिंकून टीम इंडियाने मालिका खिशात घातली.

भारताने ऑस्ट्रेलिया विरूद्ध जिंकलेल्या मालिकेनंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत 71.7 टक्के गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे. तर 70 टक्के गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत आस्ट्रेलियाची घसरण झाली असून, आता तो 69.2 टक्के गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल स्थानावर पोहोचल्याची माहिती आयसीसीने दिली आहे. ‘गाबा कसोटीतील दणदणीत विजयांनंतर भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे’, असे ट्वीट आयसीसीने केले आहे.

भारताला आता इंग्लंडबरोबरची चार कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकारने जिंकणे आवश्यक आहे. जर भारताने असे केले तर जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आपले स्थान निश्चित करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत 5 फेब्रुवारीपासून होणारी कसोटी मालिका सुरू होणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी प्रथमच अष्टपैलू अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, मयंक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub