शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे : शालेय शिक्षण मंत्री

शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली पाहिजे : शालेय शिक्षण मंत्री

परभणी (प्रतिनिधी) : देशात कोरोनाचा हाहाकार सूरू असताना, सद्यास्थितीत शाळा कॉलेज हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या या काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात डिजिटली, ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळेल यासाठी प्रशासनातील सर्व घटकांनी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नाविण्यपूर्ण कल्पकतेने शिक्षण दिले जात असून परभणी जिल्ह्यातील शिक्षणाची स्थिती चांगली आहे. यापुढेही विद्यार्थ्यांना अधिकाधिक ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून पोहचणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, अँड्रॉइड मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शिक्षण, प्रत्यक्ष ऑनलाईन शिक्षण देत असतांना येणाऱ्या अडचणी, कोरोनाच्या काळात शाळा बंद पण शिक्षण सुरु होते. शिक्षणाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पारंपारिक पर्यायासोबतच विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहचेल यासाठी सर्वांगिण काम करण्याचे निर्देशही प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या बोलत होत्या. यावेळी आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, जि.प.उपाध्यक्ष अजय चौधरी, जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त देविदास पवार आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजूषा मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती.


महाराष्ट्र शैक्षणिक