जिल्ह्यातील अकरा कोरोना केअर सेंटर्स रिकामे!

जिल्ह्यातील अकरा कोरोना केअर सेंटर्स रिकामे!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात 2 हजार 105 उपचाराधीन रुग्ण असले तरी कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटरमध्ये केवळ 332 रुग्ण उपचार घेत असून, रुग्णांअभावी 24 पैकी 11 कोरोना केअर सेंटर्स सध्यस्थितीत बंद आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला असून, रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर्स रुग्णांअभावी ओस पडत आहेत. शहरी भागातील कोरोना रुग्णालयांव्यतिरिक्त तालुक्याच्या ठिकाणी प्रशासनाने कोरोना केअर सेंटर सुरू केले होते. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर या सेंटर्समध्ये उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील एकूण 24 कोरोना केअर सेंटरपैकी सध्या 11 सेंटरमधील खाटा रिक्त आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये 2 हजार 390 खाटा उपलब्ध असून, केवळ 99 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यामुळे 2 हजार 291 खाटा रिकाम्या आहेत. कोरोना रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर्समध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अवघी 332 असून दोन्ही ठिकाणच्या मिळून 3 हजार 329 खाटा रिक्त आहेत. या आकडेवारीवरून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटल्याचे दिसून येत आहे.

संस्थात्मक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन लागण्याचे प्रमाणही सध्या कमी झाले आहे. अतिदक्षता विभागात 533 आणि अतिदक्षता विभागवगळता 554 अशा 1 हजार 87 ऑक्सिजन खाटा रुग्णांसाठी सज्ज ठेवल्या असून, अतिदक्षता विभागात 69 रुग्ण ऑक्सिजन खाटांवर तर 19 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत तर अतिदक्षता विभागवगळता इतर ठिकाणी 89 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सध्यस्थितीत 158 आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub