जिल्हा अनलॉक झाला तरी मजुरांचे हात रिकामेच!

जिल्हा अनलॉक झाला तरी मजुरांचे हात रिकामेच!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, मागील एक वर्षापासून मजुरांच्या हाताला लॉकडाऊनमुळे काम मिळाले नाही. सध्या जिल्हा अनलॉक झाला असून, हाताला काम मिळेल या आशेवर दररोज शेकडो मजूर शहरातील शनिवार बाजार परिसरात एकत्र येत आहेत, परंतु मजुरांची संख्या हजारात तर कामांची संख्या शंभरात अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील शनिवार बाजार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी मजूर, बांधकाम करणारे मिस्त्री, प्लंबर, खोदकाम करणारे कामगार यांचा दररोज सकाळी राबता असतो. या ठिकाणी एकत्रित जमणाऱ्या मजुरांच्या हाताला बांधकामाच्या साईटवर छोटे-मोठे काम करण्यासाठी गुत्तेदार किंवा मुकादम, कंत्राटदार येथे येतात. ते आवश्यक असलेले कामगार निवडून त्यांना रोजचा भत्ता ठरवून काम देतात. मात्र, लॉकडाऊनने मजुरांच्या हाताला काम मिळत नव्हते. आता मात्र, जिल्हा अनलॉक झाला असून, येथे दररोज शेकडो मजूर हाताला काम मिळेल, या आशेवर एकत्र येत आहेत, परंतु दिवसभर थांबूनही केवळ 50 ते 100 जणांच्याच हाताला काम लागत आहे, तर बाकी मजुरांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.

शहरातील शनिवार बाजार परिसरात दररोज कामाच्या अपेक्षेने येणाऱ्या मजुरांची संख्या जवळपास 1 हजारांच्या वर आहे; मात्र यातील फारतर 50 ते 100 जणांनाच काम मिळते. बाकी अनेक जण कमी पैशांत तरी काम मिळेल याची प्रतीक्षा करत अर्धा दिवस येथेच वाट पाहतात. मात्र काम न मिळाल्यास तसेच घरी परततात. येथे जमणाऱ्या कामगार किंवा मजुरांच्या हाताला जर काम मिळाले तर त्यांना दिवसाला त्यांच्या कामाच्या स्वरुपानुसार किमान 500 ते 600 रुपये दिले जातात, अशी माहिती येथील काही कामगारांनी दिली.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub