मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण!

मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण!

परभणी (प्रतिनिधी) : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सून हंगामात सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, अपेक्षेपेक्षा चार दिवस उशीराने केरळमध्ये आमगन करणारा मान्सून महाराष्ट्रात दोन दिवस आधीच दाखल झाला. दरम्यान, यावर्षीच्या पावसाळ्यात बुधवार दि. 09 जून रोजी बरसलेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासीयांची दाणादाण उडाली. या पावसामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले, रस्त्यावर जागोजागी पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर पूर्णा आणि जिंतूर तालुक्यातील सात मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसत असून, अद्याप मान्सून दाखल झाला नाही. बुधवार दि. 09 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मध्यम स्वरुपाचा असलेल्या या पावसाने काही वेळातच जोर पकडला. त्यानंतर सकाळी 7.30 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. या पावसामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागले. या पावसाचा जोर परभणी, जिंतूर आणि पूर्णा या तालुक्यांमध्ये अधिक होता. तर बुधवारी संध्याकाळी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.

जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळात 100 मि.मी., आडगाव 82 मि.मी., दुधगाव 81 मि.मी., पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात 114.8 मि.मी., लिमला 67, कात्नेश्वर 68 आणि चुडावा मंडळात 65.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या सातही मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, परभणी तालुक्यातील परभणी मंडळात 61 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या पिंगळगड नाल्याला पूर आला. परभणी ते गंगाखेड या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी पुलाची कामे सुरू असून, शहराच्या हद्दीत एका बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे परभणी तालुक्याच्या हद्दीतील हा रस्ता पाण्याखाली गेला होता.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub