परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय!

परभणी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय!

परभणी (प्रतिनिधी) : कोरोनामुळे जिल्ह्यात अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता मात्र, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यास सूरूवात झाली असून, रहदारी वाढली आहे. दरम्यान, परभणी रेल्वेस्थानकाचा समावेश मॉडेल स्थानकात करण्यात आलेला असून, स्थानकाचे सुशोभीकरण तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, काही कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नसून, प्रवाशांची गैरसोय होत आहे.

परभणी रेल्वेस्थानच्या सुशोभीकरणाचे काम सूरू झालेले असून, यातील महत्त्वाची 2 कामे पूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासी यांच्यासाठी लिफ्ट, इलेक्ट्रिक पायऱ्या (एस्केलेटर) बसविण्यात आले. परंतू, स्थानकातून प्रवेश केल्यावर हे अंतर लांब पडत असल्याने त्याचा वापर होत नसल्याचे दिसून येते. यामुळे ही साधने नेहमी बंद अवस्थेत असतात, अशी प्रवाशांची तक्रार आहे. तसेच मॉडेल स्थानकात सांगितल्याप्रमाणे प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर आसन व्यवस्था, विश्रामगृह आणि पिण्याचे पाणी, दुसरे प्रवेशद्वार तसेच नवीन आरक्षण खिडकी यांची काही कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत.

परभणी स्थानकावर सध्या तीन प्लॅटफॉर्म आहेत. त्यामध्ये 2 आणि 3 हे एकत्रत आहेत. नांदेडहून परळी, औरंगाबाद दिशेला जाणाऱ्या रेल्वे गाड्या या ठिकाणी येतात तर प्लॅटफार्म 1 वर औरंगाबाद येथून येणाऱ्या रेल्वे येतात. लिफ्ट किंवा एस्केलेटर जेथे बसविले ती जागा स्थानकात प्रवेश करणाच्या जागेपासून औरंगाबाद मार्गाकडे खुप लांब अंतरावर आहे. विशेष म्हणजे, परभणी रेल्वेस्थानकात 24 डब्याच्या 3 ते 4 रेल्वे येतात. ज्यात रेल्वेच्या थेट पाठीमागे आरक्षण असलेल्या एखाद्या प्रवाशाला जर लिफ्ट, एस्केलेटर वापरायचे झाल्यास त्यास पूर्ण प्लॅटफॉर्मला पायी फेरा मारावा लागतो.

परभणी स्थानकात मागील 2 वर्षांपूर्वी एक नवीन प्रवेशद्वार आणि आरक्षण खिडकी उभारण्यात आली त्याचा समावेश मॉडेल स्थानकात होता; परंतु, अजूनही या खिडकीचा वापर आरक्षण केंद्रासाठी करण्यात आलेला नाही. जुन्याच तिकीट घरातील आरक्षण खिडकीचा वापर अजूनही केला जात आहे. दरम्यान, रेल्वेस्थानकावरील सध्या असलेला जुना दादरा अनेक वर्षांपूर्वींचा आहे. तो रूंदीला कमी असल्याने प्लॅटफॉर्म 1 ते 3 ला जोडण्यासाठी याच्या बाजूला सध्या नवीन दादऱ्याचे काम सुरू आहे. नवीन दादरा नांदेड दिशेला बांधल्या जात आहे. या दादऱ्याला एकाच बाजूने पायऱ्या केल्या जात आहेत. त्याही नांदेड दिशेला. ह्याच पायऱ्या प्लॅटफॉर्म 2 आणि 3 वर परभणी स्थानकाच्या प्रवेशद्वार मार्गावर काढणे अपेक्षित आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub