विदर्भात परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था!

विदर्भात परीक्षेला जाणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण राज्य हे कोरोना महामारीशी झूंज देत असून, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पुन्हा निर्बंध घालण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंध लावला आहे. परंतु, विदर्भात आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा होत आहेत. मात्र, या परीक्षेस उमेदवार मुकु नये म्हणून परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली.

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शासनाकडून आरोग्य विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवारांच्या परीक्षा होणार आहेत. याच प्रमाणे विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ व इतर जिल्ह्यामध्ये देखील या परीक्षा होत असून, परभणीतील उमेदवारांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आसन व्यवस्था (परीक्षा केंद्र) करण्यात आली आहे. परंतु, परभणी जिल्हा प्रशासनाने विदर्भात जाणाऱ्या आणि तिकडून येणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर प्रतिबंध लावला आहे.

राज्यात आधीच आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असून, सदर उमेदवारांना देखील नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या दोनही बाबी पाहता, एसटी महामंडळाने विदर्भात जाणाऱ्या बसेस 27 फेब्रुवारी रोजी पाठवाव्यात. तसेच परतीत 28 फेब्रुवारी रोजी तेथून सायंकाळी परभणीकडे वापस आणाव्यात. यासाठी आपल्या स्तरावर परवानगी द्यावी. महत्त्वाचे म्हणजे या प्रवासी वाहतुकीत आरोग्य विभागाच्या परीक्षा देणार्या् उमेदवारांना प्राधान्य द्यावे, आमदार डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर तसेच परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांच्याकडे शुक्रवारी सायंकाळी केली होती.

आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारांसाठी स्वतंत्र प्रवासी बसची व्यवस्था करण्याच्या मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात लागलीच निर्णय घेऊन एसटी महामंडळाला स्वतंत्र बस सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लागलीच परभणीचे आगारप्रमुख दयानंद पाटील यांनी शनिवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अमरावती नागपूरसाठी तसेच रात्री सात ते आठच्या दरम्यान देखील नागपूर अमरावतीकडे जाणाऱ्या बसेस सोडल्या. दरम्यान, परीक्षार्थींनी आपले आसन व्यवस्था राखीव करून घ्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी यावेळी केले.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub