आता परभणीकरांना रिक्त खाटांची माहिती तात्काळ मिळणार!

आता परभणीकरांना रिक्त खाटांची माहिती तात्काळ मिळणार!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या सर्वत्र कोरोनाच्या संक्रमणावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. असे असले तरी मात्र, पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन यांची कमतरता, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तसेच कोरोना लसींचा मोठा तुटवडा सध्या जाणवत आहे. अशातच मात्र, जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील उपलब्ध खाटांची माहिती आता थेट लोकांच्या हाती येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून मोबाईल ॲप विकसित करण्यात आले असून, या ॲपमुळे लोकांना तातडीने रुग्णालयातील रिक्त बेडची माहिती मिळविण्यास सोपे होणार आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुचा वेगाने प्रसार होत आहे. परभणी जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर तात्काळ उपचार होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 13 कोविड केअर सेंटर, 4 डेडीकेटेड कोविड रुग्णालय आणि 27 डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यरत आहेत. या केंद्रावर उपलब्ध रिक्त खाटांची माहिती नागरीकांना लाईव्ह मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून पीबीएनलाईव्हबेडस (PBNLiveBeds) हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. ज्याद्वारे जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयामधील सद्यस्थितीत रिक्त असलेल्या खाटांची माहिती आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे.

परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://parbhani.gov.in) नागरीकांना हे ॲप विनामुल्य डाऊनलोड करता येणार असून, लवकर हे ॲप गुगल ॲप स्टोअरवरुन सुध्दा विनामुल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी कोविड उपचार केंद्रातून सद्यस्थितीत उपलब्ध खाटांची माहिती सबंधीत उपचार केंद्रातून भरण्यासाठी सर्व केंद्रांना स्वतंत्र्य लॉगीन देण्यात आलेले असून, माहिती भरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. संबंधीत उपचार केंद्रातून नवीन रुग्ण भरती झाल्याबरोबर या ॲपमध्ये माहिती भरल्यानंतर तात्काळ ही माहिती नागरीकांना उपलब्ध होणार आहे.

जिल्हातील सर्व नागरीकांनी पीबीएनलाईव्हबेडस (PBNLiveBeds) हे ॲप डाऊनलोड करावे आणि रिक्त खाटांची माहिती प्राप्त करावी. या ॲपमुळे सर्वसामान्य नागरीकांची अडचण दुर होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.


ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub