मागील तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभर पेक्षा कमी!

मागील तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभर पेक्षा कमी!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट ओढवले असून, अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. तर जिल्ह्यात मंगळवार दि. 1 जून रोजी 64 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, मागील तीन दिवसांपासून नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभर पेक्षाही कमी आहे. असे असले तरी मात्र बरे होण्याचे प्रमाण अद्यापही वाढलेलेच आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाणही घटल्याने नागरिकांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मंगळवार दि. 1 जून रोजी आरोग्य विभागाला 1 हजार 676 नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या 1 हजार 329 अहवालांमध्ये 50 रूग्ण आणि रॅपिड टेस्टच्या 347 अहवालांमध्ये 14 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जिल्ह्यात मंगळवारी एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आयटीआय हॉस्पिटलमध्ये 1 आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात 1 रुग्ण असे एकूण दोन रूग्ण मृत्यू पावले आहेत.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 408 रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्यामुळे मंगळवारी या रुग्णांना कोरोनामुक्त जाहीर करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूचा दर कमी झाला असला तरी बरे होण्याचे प्रमाण संतगतीने वाढत आहे. दरम्यान, सध्यस्थितीला जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 49 हजार 987 झाली असून, त्यापैकी 45 हजार 966 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 233 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या 2 हजार 788 रुग्ण उपचार घेत आहेत.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub