तुळजापुरात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नाही

तुळजापुरात बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नाही

तुळजापुर (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने तुळजापुरात येणारे सर्व प्रवेश रोखले आहेत. तुळजापूर शहरात येणारे चार मुख्य रस्ते आहेत आणि चारही रस्त्यांवरती मुख्यभागी पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले असून, त्यावर प्रवेश बंद असा फलक लावला आहे.

राज्यात नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूर शहराच्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश मिळणार नाही, असे तीन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जे तुळजापूरचे रहिवासी आहेत, त्यांना जर शहरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी त्यांच्याकडे आधारकार्ड असणे अनिवार्य आहे. त्यांचे आधार कार्ड तपासल्याशिवाय शहरात प्रवेश देण्यात येणार नाही. एवढेच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील नागरिकांनाही प्रवेश देण्यात येणार नाही, असे प्रशासनाने सांगितले होते आणि आजपासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जात आहे.

राज्यात अनलॉक पाचमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. दरम्यान, साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात किमान 15 लाख भाविक दर्शनासाठी येतात. दर्शनाच्या रस्त्यांवर भली मोठी रांग असते. या पार्श्वभूमीवर तुळजापुरात दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub