राज्यात यंदा होणार ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा

राज्यात यंदा होणार ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा

मुंबई (प्रतिनिधी) : जीवघेण्या कोरोना वायरसपुढे संपुर्ण राज्य हतबल झाले असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून अनेक बाबींना सुट दिली जात असली तरी मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाच्या संकंटाने अनेक प्रथा, परंपरा मोडित निघाल्या. राजकारणातही शिवसेनेचे शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. पण कोरोनाचे संकंट असल्यामुळे यंदा ऑनलाईन दसरा मेळावा साजरा होण्याची शक्यता आहे.

राज्यात अनलॉक पाचमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. त्यासोबतच लोकल सेवा, जिम, सिनेमागृह देखील अजून सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शिवतीर्थावर राज्यभरातून होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा दसरा मेळावा ऑनलाईन साजरा होणार आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंपासून दसरा मेळाव्याला महत्व आहे. बाळासाहेबांचे भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक राज्यभरातून जमत असे.

बाळासाहेबांची भाषणांची शैली, अभिनय, अधूनमधून शिव्या आणि विरोधकांवर टीका ही शिवसैनिकांना हवहवीशी वाटणारी होती. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. प्रथा आणि परंपरेनुसार दसरा मेळाव्यात पहिल्यांदा शस्त्रपूजा केली जाते. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची भाषण होत असे आणि सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करत. दरम्यान, राज्यात यंदाही दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची आधी भाषणे होतील, मग रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे भाषण करतील.

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर यंदाचा पहिलाच दसरा मेळावा आहे. हा दसरा मेळावा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे नियोजन शिवसेना नेत्यांचे होते, मात्र कोरोनामुळे आता ते शक्य होणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचे प्रकरण. या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. त्यांनी अतिशय संयमी भूमिका निभावली. पण आपण मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यामुळे या तीन प्रकरणांवर ते काय बोलणार हे उत्सुकतेचे असणार आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub