येलदरीच्या पाण्यातून राज्याच्या तिजोरीत 14 कोटींचा महसुल

येलदरीच्या पाण्यातून राज्याच्या तिजोरीत 14 कोटींचा महसुल

परभणी (प्रतिनिधी) : राज्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाची हजेरी सुरूच आहे. महाराष्ट्रात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला असून, सध्या महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने जिल्ह्यासाठी वरदान लाभलेल्या येलदरी येथील प्रकल्पातून गेल्या 7 महिन्यांमध्ये 46.14 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली असून, याद्वारे राज्याच्या तिजोरीमध्ये 14 कोटी रुपयांच्या महसूलाची भर या सिंचन प्रकल्पाने घातली आहे.

जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पाने परभणीसह हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमधील अनेक शहरे आणि गावांची तहान भागविली आहे. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्र सिचंनाखाली आले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पात 100 टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे येथील वीज निर्मिती प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आला. एप्रिल महिन्यापासूनच प्रकल्पाची वीज निर्मिती सुरू करण्यात आली. मध्यंतरी हा प्रकल्प बंद होता; परंतु, 12 ऑगस्ट रोजी येलदरी धरण 100 टक्के भरल्याने अतिरिक्त होणारे पाणी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडण्यात आले.

कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन आणि कमी मनुष्यबळ असतानाही या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचे केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे. या प्रकल्पात करण्यात आलेल्या विज निर्मितीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 कोटी रुपयांची भर घातली आहे. महानिर्मितीचे मुख्य अभियंता ए.एस. कुलकर्णी, नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.के. रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अखंडीतपणे हे केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग 72 दिवस पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Click here to join the WhatsApp group.

Shaikh Yakhub