परभणीत प्राणवायूसाठी प्रशासनाला करावी लागत आहे तारेवरची कसरत!

परभणीत प्राणवायूसाठी प्रशासनाला करावी लागत आहे तारेवरची कसरत!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून, परभणीकरांसमोर संकट उभे राहिले आहे. त्यातच, ऑक्सिजनची कमतरता भासत असल्याने परभणीकर चिंतेत होते. परंतू आता परभणीकारांना ऑक्सिजनबाबत चिंता करण्याची गरज राहिली नसून, परळीच्या औष्णिक वीज केंद्रातून आणलेली प्राणवायूची यंत्रणा सुरू केली जाणार आहे. मात्र, यासाठी दिवसेंदिवस होत असलेला विलंब, बेल्लारीहून दिवसाआड होणारा प्राणवायूचा बंद झालेला पुरवठा, जिल्हा परिषद इमारतीतील यंत्रणा सुरू झाली तरी प्राणवायू साठवण्याबाबत असलेली या यंत्रणेची मर्यादा अशा सर्व बाबी लक्षात घेता प्राणवायू उपलब्धतेसाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे.

परभणी येथील नविन जिल्हा परिषद इमारत परिसरात बसवण्यात आलेली प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले, तरी अद्यापही या प्रयत्नांना यश आले नाही. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी किमान अर्धा तास संपूर्ण वीज बंद करावी लागणार असून, या इमारतीत असलेल्या कोविड केंद्रात काही रुग्ण ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत तूर्त तरी ते शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही यंत्रणा कार्यान्वित झाली तरी या यंत्रणेचा उपयोग केवळ जिल्हा परिषद कोविड केंद्रामधील पन्नास खाटांसाठीच होणार असल्याने या यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती होईल अशी अपेक्षा फोल ठरत आहे.

परळी येथील औष्णिक वीज केंद्रातून प्राणवायूची यंत्रणा परभणी शहरातील नविन जिल्हा परिषद इमारतीत बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा या कोविड केंद्राची गरज भागवून दररोज जम्बो सिलिंडरमध्ये प्राणवायू साठवेल असे आडाखे बांधण्यात येत होते, आता मात्र ते प्रत्यक्षात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे आता या यंत्रणेवरून जम्बो सिलिंडर भरून घेता येणार नाहीत ही बाब निश्चित झाली आहे. खुद्द प्रशासनालाही या सर्व बाबींचा उलगडा हळूहळू होत आहे. सध्या ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी अर्धा तास त्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करावा लागणार आहे.

जिल्हा परिषद इमारतीतील कोविड केंद्रात व्हेंटिलेटरवर असलेले सर्व रुग्ण एका कक्षात हलवून त्या कक्षाला जनरेटरमार्फत ऊर्जा देऊन वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो आणि प्राणवायू यंत्रणा सुरू केली जाऊ शकते. विशेष म्हणजे या यंत्रणेला ‘बूस्टर कॉम्प्रेसर’ची आवश्यकता आहे, तो ‘महाजनको’ने दिलेला नाही. त्यातच, 700 केव्ही च्या जनरेटरवर सुद्धा ही प्राणवायू यंत्रणा चालत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्राणवायूसाठी परभणी प्रशासनाला दररोजच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, सध्या जिल्ह्यसाठी चाकणहून दिवसाआड प्राणवायूचा टँकर येतो. दर दिवशी 20 टन प्राणवायू चाकणहून अपेक्षित असला, तरी प्राणवायूचा टँकर तेथून येणे आणि येथे रिकामा करून पुन्हा चाकणला रवाना होणे या प्रक्रियेत खूप वेळ जात असल्याने सध्या दिवसाआड 15 टन प्राणवायू चाकणहून येत आहे. कर्नाटक सरकारने बेल्लारीहून पुरवठा होणारा प्राणवायू बंद केला आहे. या सर्व अडथळ्यांचा विचार करून आता 13 ‘केएल’ द्रवरूप प्राणवायूसाठी नवी पर्यायी यंत्रणा जिल्हा परिषद इमारत परिसरात उभारली जात आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub