परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तीन दिवसांचा दिलासा!

परभणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना तीन दिवसांचा दिलासा!

परभणी (प्रतिनिधी) : सध्या जिल्ह्यातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, रुग्णालयातील रिक्त खाटांची संख्या वाढली आहे. असे असले तरी मात्र, कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसल्याने जिल्ह्यातील संचारबंदीच्या कालावधीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आले असून, बाजारपेठेतील सर्व दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशामुळे व्यापाऱ्यांना किमान तीन दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने 1 जूनपासून बाजारपेठेतील व्यवहार सुरळीत सुरू होतील, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा होती. या दरम्यानच्या काळात राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीत अधिक सवलती देण्याचा निर्णय घेतला होता. परभणी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला असल्याने जिल्ह्यात सवलती वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवार दि. 31 मे रोजी सायंकाळी संचारबंदीचे नवे आदेश काढून जिल्ह्यात 16 जूनपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर 24 तासात संचारबंदीच्या आदेशात बदल करण्यात आले असून, 4 जूनपर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली आहे.

लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांचा पाठपुरावा व सध्याची व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवार दि. 1 जून रोजी नवे आदेश काढून, बाजारपेठेतील सर्व आवश्यक गटात समावेश नसलेली इतर दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत झाले, त्यानुसार 2 ते 4 जून या तीन दिवसांसाठी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आवश्यक गटात समावेश नसलेले इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जात असल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र, शनिवार व रविवार रोजी ही दुकाने बंद राहतील. जिल्हा प्रशासनाच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांना किमान तीन दिवसांसाठी दिलासा मिळाला आहे.


जागरूकता बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Shaikh Yakhub